केवल चौधरी वयाच्या पंचविसाव्या वर्षी राजस्थानातल्या हनुमाननगरमधून आपल्या पत्नीसह पुण्यात आला आणि कुण्या दूरच्या राजस्थानी मित्राच्या किराणा मालाच्या दुकानावर कामाला लागला. त्याच दुकानाच्या मागे असलेल्या दोन खोल्यात तो मित्र त्याच्या कुटुंबासहीत राहायचा आणि त्याच्या पत्नीने केवल चौधरी आणि त्याची पत्नी गुड्डी यांना आपल्यात सामावून घेतले. गुड्डीनेही आदर राखून त्या दोन खोल्यांची बरीचशी जबाबदारी स्वतःवर उचलली आणि काही महिन्यातच वेळ अशी आली की तो मित्र, ज्याचे ते दुकान होते, तो आता आणखीन एक दुकान टाकायच्या मागे लागला आणि हे दुकान पूर्णपणे केवल चालवू लागला. त्या मित्राचे दुसरे दुकान चालू झाल्यावर त्याने केवलला विचारले की केवल काय आयुष्यभर या आधीच्याच दुकानात राबणार आहे का? त्यावर केवलने नम्रपणे पण ठामपणे उत्तर दिले की त्यालाही एक दुकान काढायचे आहे. मग मित्राने मौलिक सल्ले दिले व एका विशिष्ट भागात असे दुकान अत्यावश्यक आहे हे सांगीतले. तसेच सुरुवातीचे भांडवल म्हणून चक्क तीन लाख रुपये दिले जे केवलने दोन वर्षात फेडायचे होते.
त्या रात्री आयुष्यात पहिल्यांदाच गुड्डी आणि केवल चक्क रस्त्यावर फिरायला गेले. एकमेकांशी खूप बोलले. खूप हासले. स्वप्नांच्या पणत्या डोळ्यात ठेवून आणि एकमेकांबरोबर हनुमाननगरमध्ये चाललो असतो तर किती लोकांनी किती टीका केली असती या कल्पनेवर खुसखुसत रात्री दहा वाजता ते घरी परतले.
बाळू गाडे आता बाळासाहेब झाला होता कारण पिरंगुटजवळचा त्याचा एक अत्यंत पडीक आणि निकामी प्लॉट एका हॉटेलवाल्याने चक्क एक कोटी रुपयांना घेतला होता. बाळासाहेब आता शहरात चार खोल्या विकत घेऊन राहू लागला होता. एकटाच होता. दोन खोल्या खाली आणि दोन वर! दिवसभर बुलेटवरून गावभर फिरणे, मित्र जमवणे, मटणाच्या पार्ट्या आणि राजकारणात कुत्रेही विचारत नसतानाही कुठे ना कुठे स्वतःची वर्णी लावायच्या प्रयत्नात राहणे!
त्यातच मनसेचे विचार त्याला पटू लागले. आपल्या प्रदेशात सुबत्ता आणि संधी आहेत म्हणून परप्रांतातील लोक येथे येतात आणि त्यांची संख्या अमाप वाढल्यामुळेच पाणीकपात, वीजकपात, महागाई, जागांचे वाढते भाव, शिक्षणाचे प्रॉब्लेम्स आणि रहदारीच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत हे त्याला पूर्णपणे पटू लागलेले होते. मनसेच्या विचारांचा आहे हे सांगण्यात त्याला आता अभिमान वाटू लागला होता. मात्र मनसेला अश रिकामटेकड्यांची गरज नव्हती. परप्रांतियांबाबत मनसेची पॉलिसी काहीशी तशीच असली तरीसुद्धा मनसे हा एका विचारी नेतृत्वाने काढलेला पक्ष होता. त्यात काम करणारे हवे होते, नुसते मलई पळवणारे नको होते. त्यामुळे बाळासाहेब जरी कितीही 'मनसे, मनसे' करत असला तरी त्याला पूर्ण पारखून घेतल्याशिवाय मनसेत कुणीही प्रवेश देणार नव्हते.
आज सकाळी बाळासाहेब खालच्या हॉलमध्ये पेपर वाचत मिश्री लावत तंगड्या पसरून बसलेला होता. अजून कालची नीट उतरलेली नव्हती. लालभडक डोळे, पिंजारलेले केस, अस्ताव्यस्त कपडे आणि अगडबंब देह यामुळे तो किळसवाणा दिसत होता. पण त्याला त्याच्याशी काहीही देणेघेणे नव्हतेच!
दार वाजले म्हणून त्याने मान फिरवून पाहिले आणि दचकलाच! त्या जोडप्यातील ती पोरगी म्हणजे मस्त माल वाटला त्याला! तिच्या मारवाडी हिरव्या अशा हायलायटरटाईप कलरच्या साडीतून तिचा देह जेवढा दिसेल तेवढा दोन सेकंदात निरखत त्याने उर्मटपणे "काय' असे विचारणारी खूण केली.
'मला बाबू चौधरींनी आपला पत्ता दिला असून आपली परवानगी असल्यास भाडेतत्वावर ही खालची खोली आम्ही किराणा मालाच्या दुकानात कन्व्हर्ट करून नियमीतपणे आपल्याला भाडे देत राहू' असे केवलने त्याला सांगीतले. वास्तविक बाळासाहेबच्या मनात दोन विचार होते. एक म्हणजे मनसेचा आहे म्हंटल्यावर परप्रांतियांना खोली देणे योग्य नाही. दुसरे म्हणजे काही झाले तरी नुसते साठवलेल्या पैशावर धमाल करण्यापेक्षा काही नियमीत उत्पन्न सुरू झाले तर उत्तमच होईल! आणि या दोन विचारांना झाकणारा तिसरा विचार मनात आला. पुढेमागे या मारवाड्याची ही बायको पटवता आली तर घरबसल्या मजा करता येईल. नाहीतरी मनसेत आपल्याला अजून कुणी विचारतच नाही. आपले विचार आता बदलले असून सर्व प्रांतातील लोकांबद्दल आपल्या मनात आता बंधूभाव आहे असे जाहीर करून काँग्रेसला जॉईनही होता येईल. नाहीतरी सत्तेत सारखा तोच पक्ष असतो.
या निर्णयावर येण्यासाठी सर्वात मोठा घटक जर कोणता कारणीभूत झाला असेल तर गुड्डी! तीही अगदी दिलखुलास हासत वगैरे होती. तिच्या त्या चांदीच्या रंगाच्या शरीराचा आणि आमंत्रण असलेल्या स्मितहास्याचा पागल झाला होता बाळासाहेब!
आणि त्याने होकार देऊनही टाकला.
दोन वर्षांनंतरः
गुड्डी कधीच हाती न लागल्यामुळे आणि शेवटी तिने भैय्या असे म्हणून राखी बांधल्यामुळे बाळासाहेबला आता फुकटचे भाऊ म्हणवून घेण्यातील सुख महत्वाचे आहे असे स्वतःलाच समजवावे लागते. मिळणारे भाडे नियमीत व अत्यंत आकर्षक असल्यामुळे हे दुकान बंद करायला लावण्याचा विचार त्याच्या मनात येत नाही. वरच्या दोन खोल्या आपल्याला पुरतात हे कळल्यामुळे तो आता फालतू दुकानात येऊन बसत नाही. तयच्या घरात लागणार्या बर्याचशा जिनसा दुकानातून आपोआप फुकट वर येत असतात. न मागता! केवल चौधरीच्या आता इतक्या ओळखी झालेल्या आहेत की बाळासाहेबपेक्षा मोठाल्ले दादा लोक त्याच्याशी हसून खेळून असतात. तो काही जणांना हप्तेही नियमीत पुरवतो. आता त्याने दुकानात राजस्थानची दोन लहान मुलेही कामाला ठेवलेली असून ती रात्री दुकानात झोपतात तर केवल आणि गुड्डी आपल्या नवीन बाळाला घेऊन मागच्या खोलीत! ते दुकान ही आता त्या भागाची वाढती गरज बनत असून तेथे रीघ लागलेली असते. 'मेरे कमरेमे इतना धंदा कररहा है और मेरेको इतनाच भाडा देताय भोसडीके' या बाळासाहेबने अनेकवेळा रागात उच्चारलेल्या प्रश्नाचा आवाज भिंतींना आदळायच्या आत केवलने भाडे वाढवून टाकलेले आहे प्रत्येकवेळा! आता ती जागा केवलच्या दुकानामुळे ओळखली जाते. इतकी, की बाळासाहेबही स्वतःचा पत्ता सांगताना हनुमान किराण शॉपच्या वर असा सांगतो.
काही महिन्यांपुर्वीच बाळासाहेब दुपारीच तर्र होऊन दुकानात आला आणि काही बाटल्या उघडून खाद्यपदार्थ तोंडात टाकू लागला. एकही गिर्हाईक दुकानात नसल्याचा फायदा घेऊन केवलने सरळ सरळ बाळासाहेबला दम भरला.
"पूछके लेलिय कीजिये... ये माल बेचकर रोट्टी कमाते है हम..."
कशी कुणास ठाऊक, पण केवलला दम भरायची हिम्मतच झाली नाही बाळासाहेबची! बाळासाहेब आता काँग्रेसमध्येही नाही आणि मनसेत तर कधी त्याला घेतलेलेच नव्हते.
साठवलेले पैसे अजून बरेच शिल्लक असल्यामुळे मध्यंतरी त्याने एक ढाबा टाकायचा प्रयत्न केला. पण त्या मराठी मित्राने त्यालाच फसवले. त्यात कित्येक लाख रुपयांचा घाटा झाला. आता ते पैसेही नाहीत आणि केवलकडून मिळालेल्या भाड्यात इतकी व्यसने आणि बुलेट बिलेट परवडतही नाही.
आजच दुपारी त्याने केवलला गिर्हाईकांसमोर दम भरला.
'हे दुकान मी चालवणार आहे.. तू चालता हो... '
संध्याकाळी वस्तीतील चार जाणती माणसे आणि एक दादा असे त्याला त्याच्यावरच्या खोलीत भेटून गेले. विषय संपला. ते सगळे मराठीच होते. पण धान्यबिन्य आणायला चार पावले चालून पुढच्या चौकात जायला तयार नव्हते. त्यापेक्षा केवलचे दुकान हीच त्यांची गरज होती.
आता बाळासाहेब खाली उतरला तरी दुकानाकडे एक नजरही न टाकता निघून जातो बाहेर! गुड्डी तर आता मालकिणीच्या थाटातच वावरते. तिला दोन मुले आहेत. ती आता शेठाणीसारखी दुपारी गल्ला सांभाळते तेव्हा केवल आतमध्ये वामकुक्षी घेत असतो. भाडे मात्र नियमीत पोचते करतात. केवलने हुषारीने पहिल्यापासूनच भाडे पावत्या करून घेतलेल्या आहेत.
केवलने आता दुसरे दुकान टाकले आहे. राजस्थानमधून आलेल्या दोन लहान मुलांना तो आता या जुन्या दुकानात गुडीबरोबर ठेवतो आणि स्वतः नव्या दुकानात बसतो.
गुड्डीने त्याला आजच सांगीतले..
"बालासाब कहरहे थे उन्हे ये उपरके कमरे बेच देने है... खरीदले हम क्या??"
"और??"
"और क्या?? नीचे दुकान दुगना होजायेगा... हम लोग उपर रहेंगे.. "
"कीमत क्या कहरहा है??"
"वो बात आप करलीजिये... "
"चलो भाई.. जबसे तुम जिंदगीमे आयी हो... हम तो आगेही बढते चले जा रहे है..."
काहीच महिन्यात केवलने त्या खोल्याही घेतल्या. बाळासाहेब आता मोकारपणा करत इतस्ततः फिरत आहे.
चला उद्योजक घडवूया
अश्विनीकुमार फुलझेले
८०८०२१८७९७